व्हिजनरी कार्य करणारी व्हिजनरी व्यक्ती

डॉ. कुशाग्र बेंडाळे ऑस्ट्रेलियास्थित आयुर्वेदाचार्य. त्यांचे काका डॉ. योगेश बेंडाळे सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ. त्यांच्याकडूनच आयुर्वेदाबद्दलची प्रेरणा घेत आयुर्वेदातील करिअरची निवड. काकांची आयुर्वेदशास्त्रातली प्रगती डॉ. कुशाग्र बालपणापासूनच पाहात होते. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण होतानाच डॉक्टर होण्याचा निर्णय करुन नंतर वाघोलीतल्या आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेऊन डॉ. कुशाग्र यांनी बीएएमएसची पदवी पूर्ण केली.

एमबीबीएस प्रवेशासाठी गुण कमी पडले म्हणून विद्यार्थी आयुर्वेद किंवा अन्य शाखांकडे वळतात. परंतु डॉ. कुशाग्र यांचे तसे नव्हते. त्यांना दंतवैद्यकशास्त्र शाखेला प्रवेश मिळू शकत होता. परंतु त्यांनी आयुर्वेदला प्रवेश घेतला. काकांच्या क्लिनीकवर आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी डॉ. कुशाग्र बारावीपासूनच जायचे. त्यामुळे त्या काळापासूनच आयुर्वेदाशी घट्ट मैत्री जमली होती, हेच त्यामागचे कारण होते. आयुर्वेदात काकांनाच डॉ. कुशाग्र गुरू मानतात. वाघोलीच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाचे त्या वेळचे प्राचार्य डॉ. सदानंद सरदेशमुख हेही त्यांच्यासाठी गुरुतुल्य आणि प्रेरणादायी. महाविद्यालयात डॉ. कुशाग्र ऊर्जावान आणि अनेक उपक्रमात सक्रीय असायचे. या जगात खूप काही करायचे आहे, असे त्यांना त्या काळापासूनच वाटत असे. आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसमध्ये जायचे असले, तरी इतर लोक जे नियमितपणे करतात, ते न करता आयुर्वेदात काहीतरी वेगळे करायचे आहे, असे त्यांच्या डोक्यात त्या काळापासूनच होते आणि त्यानुसार मेंदुतली चक्रेही फिरत होती.
काकांचे क्लिनिक सुव्यवस्थित असल्यामुळे डॉ. कुशाग्र यांनी बीएएमएसच्या काळातही काकांकडूनच मार्गदर्शन घेतले. दुसर्या वैद्यांकडे ते गेलेच नाहीत. ऑस्ट्रेलियात प्रॅक्टिस करताना मात्र आणखी दोन मित्र व मार्गदर्शक डॉ. कुशाग्र यांना मिळाले. या प्रॅक्टिसच्या दरम्यान काही शंका मनात यायच्या. अनेकदा काका व्यग्र असल्याने त्यांच्याशी बोलता येत नसे. अशावेळी वैद्य हरिश पाटणकर आणि मुयरेश भोसकर या दोघांनी खूप मदत केल्याचे डॉ. कुशाग्र सांगतात. ऑस्ट्रेलियात प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा सुरवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. तिथे औषधांच्या वापराबाबत तसेच ती उपलब्ध होण्याबाबतही मर्यादा आहेत. पण त्या काळातही या दोघांनी औषधांबाबत मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. कितीही समस्या आल्या तरी प्रॅक्टिस चालूच ठेव, असा सल्ला दिला. त्या अडचणीच्या काळात त्यांनी मला अगदी वेळेवर योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा दिला, असेही डॉ. कुशाग्र सांगतात.
डॉ. हरिश पाटणकर हे डॉ. कुशाग्र यांचे वर्गमित्र. 16 वर्षांपूर्वी 2002-03 मध्ये ते दोघेही बीएएमसच्या पहिल्या वर्षात शिकत होते. त्यानंतर इंटर्नशिपसाठी दोघे अष्टांग आयुर्वेदमध्ये एकत्रच होते. इथे ऑस्ट्रेलियात प्रॅक्टिस करतानाही त्यांनी मार्गदर्शन केल्याचे डॉ. कुशाग्र यांनी सांगितलेच आहे. ऑस्ट्रेलियातून काही वेळासाठी भारतात आल्यावर डॉ. कुशाग्र आणि डॉ. पाटणकर एकमेकांच्या गाठीभेटीच्या निमित्ताने चर्चा झाली. तेव्हा केशायुर्वेद ऑस्ट्रेलियात का सुरू करू नये, असा विषय निघाला. त्यानंतर डॉ. कुशाग्र यांनी डॉ. पाटणकर यांना 2018 च्या सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात एक आंतरराष्ट्रीय सेमिनार आयोजित केले. डॉ. पाटणकर या सेमिनारसाठी प्रमुख वक्ते होते. या सेमिनारला भारतीय वंशाचे पहिले ऑस्ट्रेलियन काऊन्सिलर (नगरसेवक) इम्तिहाज खान हेदेखील उपस्थित होते. त्याचवेळी डॉ. कुशाग्र यांनी केशायुर्वेदची फ्रँचायजी घेतली होती.
या कॉन्फरन्सनंतर केसांचे नवीन पेशंट खूप वाढले. पहिल्या महिन्याततच पेशंटची संख्या सहासात पटींनी वाढली. त्यानंतर मधला काळ पुन्हा थोडा व्यत्ययाचा गेला. आयुर्वेदिक औषधांची कमतरता, हेअर सॅम्पल भारतात पाठविण्यातील गैरसोयी अशा काही गोष्टी त्याला कारणीभूत होत्या. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी भारतात परततल्यावर डॉ. कुशाग्र यांनी डॉ. पाटणकरांशी चर्चा केली. विशेषतः परदेशातील फ्रँचायजीधारकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे यावेळी ठरवण्यात आले. या सगळ्या गोष्टी ऑस्ट्रेलियात एकदा मार्गी लागल्या की, ओव्हरसीज फ्रँचायजीचे वेगवेगळे प्रश्न सोडवणे शक्य होईल, असे डॉ. कुशाग्र सांगतात.
केशायुर्वेदच्या प्रॅक्टिसच्या संदर्भात एक चांगला अनुभव डॉ. कुशाग्र यांनी सांगितला. एक पुरूष पेशंट हेअर ट्रान्सप्लांट करून आला. हेअर ट्रन्सप्लांट करूनही त्याच्या डोक्यावरचे पुढच्या भागातील केस गेले होते. हा पुरुष मॉडेलिंग करत असल्यामुळे केस ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे लवकर रिझल्ट मिळाला आणि गेले सहा-आठ महिने तो डॉ. कुशाग्र यांच्याकडे ट्रीटमेंट घेत आहे. ऑस्ट्रेलियातल्या विविध संस्थांसोबतही डॉ. कुशाग्र यांचे घनिष्ठ संबंध आहेत. आयुर्वेद अँड योगा फाउंडेशन या डॉ. कुशाग्र यांनीच स्थापन केलेल्या संस्थेमार्फत आयुर्वेदाचा प्रसार मोफत केला जातो. या संस्थेद्वारे नियमितपणे वेगवेगळ्या भागांत सेमिनार आयोजित केले जातात. या फाउंडेशनशी आजवर सुमारे दीडशे लोक जोडले गेले आहेत.
ऑस्ट्रेलियन आयुर्वेद असोसिएशन बोर्डाचे सचिव म्हणून काही काळ काम करण्याचा बहुमानही डॉ. कुशाग्र यांना मिळाला आहे. हे बोर्ड ऑस्ट्रेलियामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टरांना मान्यता देते. या मान्यतेशिवाय ऑस्ट्रेलियात आयुर्वेदाची प्रॅक्टिस करता येत नाही. त्याखेरीज महाराष्ट्र बिझनेसेस अँड प्रोफेशनल कौन्सिलचे सचिव म्हणूनही काही काळ डॉ. कुशाग्र यांनी कार्यभार सांभाळला. या कौन्सिलच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियामधील व्यावसायिक आणि प्रोफशनल्सच्या दरम्यान विविध गोष्टींची देवाण-घेवाण वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.

केशायुर्वेद हे एकदम उत्तम मॉडेल आहे. ही एक स्पेशलाईज्ड प्रॅक्टिस आहे. अनेकांना वेगळे काही करावेसे वाटत असते. परंतु त्यातील प्रत्येकाजवळ ते धैर्य नसते आणि त्यात आयुर्वेद प्रॅक्टिस करणार्याजवळ तर ते अभावानेच सापडते. असे वेगळे काही ज्यांना करायचे आहे, त्यांच्यासाठी हे मॉडेल सहज पचनी पडण्यासारखे, सोपे आणि सोईस्कर आहे. या गुणामुळेच याचा जगभर मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकेल.

डॉ. पाटणकरांविषयी सांगायचे तर ते खूप चांगले मित्र आहेत आणि मैत्री कशी टिकवावी हे त्यांच्याकडून शिकावे, असे डॉ. कुशाग्र सांगतात. डॉ. पाटणकरांचे प्री-प्लॅनिंग अत्यंत उत्तम आहे. यामुळेच त्यांच्या बर्याचशा गोष्टी व्यवस्थित पार पडत असतात. महत्त्वाचे म्हणजे पाटणकरांकडे आयुर्वेदाबद्दलची एक व्हीजन आहे. ती व्हीजनच त्यांना इतर डॉक्टरांपासून वेगळे करते. अशा व्हिजनरी व्यक्तीच्या व्हिजनरी कार्याला अनेक शुभेच्छा!